Rajiv Gandhi Hatya Ek Antargat Kat by Faraz Ahmed/Avdhut Dongre
Rajiv Gandhi Hatya Ek Antargat Kat by Faraz Ahmed/Avdhut Dongre
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते. लेखक व पत्रकार फराझ अहमद यांनी या पुस्तकातून या गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राजीव गांधी हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या कंगोर्यांवर प्रकाश टाकला आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आला हे खरं, पण सहानुभूतीचं वातावरण निर्माण होऊनही पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलं नव्हतं; हे लक्षात घेतलं, तर राजीव गांधी यांच्या सत्तेत परत येण्याची भीती एलटीटीईला वाटत होती, ही मांडणीच कोसळते. याचा ऊहापोह फराझ पुस्तकात करतात. मग त्यांची हत्या का झाली असावी, याचा शोध घ्यायचाही ते प्रयत्न करतात.
राजीव गांधी यांच्या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार शिवरासनने हत्येनंतर भारतातच थांबण्याचा निर्णय का घेतला? त्याला भारतातच कोणी थांबवून घेतलं? आपल्या सुरक्षेसाठी तो कोणावर विसंबून होता? जाफन्याला परतायची त्याला का भीती वाटत होती? असे प्रश्न या पुस्तकात लेखकाने उपस्थित केले आहेत.
राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यामुळे कोणाचा राजकीय फायदा झाला याचाही शोध हे पुस्तक घेतं. फराझ यांनी असा दावा केला आहे की, तत्कालीन राजकीय परिस्थितीतीच राजीव गांधींच्या हत्येमागील खर्या कटावर पांघरूण घालण्यासाठी जबाबदार होती.
जगभरातल्या भयंकर हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा आणि त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न… अर्थात् राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?